बाबा
एक दिवस अचानक माझा बाबा मेला
कुठलीच मनाची तयारी नसतांना,
ना आजाराचा सांगावा, ना
शरीर जीर्ण झाल्याचे संकेत
तरीही... तो गेला..
आई रडली, बहिण ओरडली
'जग सारं संपलं' म्हणाली
आणि म्हणाली, ‘वाचा बंद झाली
कान बहिरे झालेत, नजर गेली
सर्व सर्व संपलं....’
नंतर शांत होऊन झोपली.
कारण ती ओरडली, रडली व्यक्त झाली
परत मला जाणीव झाली
अचानक माझा बाबा मेला...
बहिणीचे शुष्क डोळे
तिच्या पाठीशी कायमची झालेली पोकळी
तिच्या भविष्याचे विस्कटलेले धागेदोरे
हो, हा गुंता सोडवण्यात मी हरवली
मी रडली नाही, ओरडली नाही
बाबा अजून स्मशानात जळायचाच होता
पण, एव्हाना जग बदललं होतं
आमचं अनाथपण घालवायला
डोक्यावरून हात फिरवायला
कुणीच नव्हतं...
होते ते फक्त अनाथपण
आपण किती एकटे असतो
हे सत्य सांगणारं मरण
आणि बापासोबत माझ्यातला हळवेपणा
जाळणारं सरन
अखेर... रात्री मी ही झोपली
आई, बहिण झोपली
पण एवढ्या रजईतही
आम्ही थरथरत होतो
का???
का????
आमचं पांघरूण हरवलं होतं...
आमची बाप नावाची रजई
जळाली होती..
असाच अचानक माझा बाबा मेला
आम्हाला अनाथ करून गेला...
#संकलित
माझा परिस्थितिशी मेळ खाणारी कविता
😢😢😢😢
Comments
Post a Comment